लोकमान्य- प्रखर राष्ट्रवादाचा धगधगता निखारा
आज लोकमान्यांची शतकोत्तर पहिली पुण्यतिथी. आपल्या देशामध्ये राष्ट्रवादाची ज्योत ज्यांनी पेटवली त्या महापुरूषाचं आज पुण्यस्मरण. केवळ महापुरुष म्हणल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आवाका लक्षात येणं अवघड आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महापुरुषाला आज मात्र आपण वाळीत टाकलं आहे हे नक्की. लोकमान्यांसारखा तेजस्वी सुर्य तळपत असताना आपण मात्र इतर मिणमिणत्या दिव्यांना राष्ट्रपुरुष बनवण्यात धन्यता मानली. अर्थात त्याची किंमत देश मोजतोच आहे. लोकमान्यांसारखा द्रष्टा महापुरुष ज्या गोष्टींसाठी आग्रही होता त्या गोष्टींना आजवर आपण तिलांजली दिली. इतिहासाच्या एका सुवर्ण पुत्राला अडगळीत टाकण्याचं काम आजवर ह्या देशानी केलं. लोकमान्यांसारखा धोरणी विचारवंत पुन्हा होईल न होईल.
ब्रिटिशांच्या हुकूमशाहीला संपूर्ण
विरोध असलेला राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च नेता म्हणजे टिळक. लोकमान्यांची
ब्रिटीशांना म्हणूनच धास्ती होती. लोकमान्यांचे विचार जनतेला पटत आहेत हे
ब्रिटिशांसाठी धोक्याची बाब होती. त्यामुळेच त्यांना वारंवार सक्तीचा कारावास दिला
गेला. हयाउलट ब्रिटिशांच्या सोयीच्या महापुरुषांना अर्थात मवाळ लोकांना सर्व
सोयीसुविधांनी युक्त असा “कारावास” दिला गेला. लोकमान्यांना ब्रिटिश घाबरण्याचं एक
अजून कारण म्हणजे त्यांनी अनेक माध्यमातून जुलुमी राजवटीविरुद्ध रान पेटवलं होतं.
कुठल्याही एका संस्थेचं बंधन लोकमान्यांना नव्हतं. लोकमान्य हे कुठल्या एका
संस्थेचे नसून ते देशाचे होते. युवकांना जर ब्रिटीशांविरूद्ध उभं रहायचं असेल तर
त्यांना शिक्षित करणं गरजेचं आहे त्यामुळे नुसतं शिक्षण नाही तर राष्ट्रीय शिक्षण
देणं हे महत्वाचं आहे हे त्यांनी हेरलं. त्यातून उभी राहिली “डेक्कन एजुकेशन
सोसायटी”. राष्ट्रसेवेला आणि राष्ट्रीय शिक्षणाला समर्पित अशी देशातली पहिली
शिक्षण संस्था लोकमान्यांनी स्थापन केली. आज त्या संस्थेत देखील टिळक शिकवले जातात
की नाही हा मुद्दा अलाहिदा. त्या संस्थेच्या शाळेत देखील लोकमान्य हे शेंगा आणि
टरफलं इतकेच उरले आहेत. ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची दैना आहे. ज्या महापुरुषानी
राष्ट्रीय शिक्षण मिळावं ह्यासाठी अवघं आयुष्य वेचलं त्या देशात राष्ट्रीय
शिक्षणाचा पुरस्कार करणारं शिक्षण धोरण यायला त्यांच्या मृत्यूनंतर १०० वर्षं जावी
लागतात हयाहून मोठी शरमेची गोष्ट नाही. लोकमान्य हे शिक्षण तज्ञ होते पण शिक्षण
“सम्राट” कधीच झाले नाहीत. कदाचित इथेच तुम्ही चुकलात टिळक; अन्यथा आज गल्लोगल्ली
तुमचे फ्लेक्स लागले असते. राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था निस्पृह असावी आणि
तिथल्या शिक्षकांनी देशसेवा म्हणून हे कार्य करावं अशी स्पष्ट भूमिका टिळकांची
होती. त्या भूमिकेलाच जेव्हा विरोध होऊ लागला तेव्हा एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे जी
संस्था उभी केली त्या संस्थेपासून हा महात्मा वेगळा झाला. लोकशाही तत्व आणि
स्वतःच्या मताशी ठाम राहणं ह्याचं हयाहून उत्तम उदाहरण इतिहासात सापडणार नाही.
लोकमान्य हे धुरंधर राजकारणी
होते. परिस्थितीनुरूप राजकारणातले पवित्रे बदलावे लागतात. परिस्थितीकडे दुर्लक्ष
करून केवळ आपल्या स्वभावानुसार राजकारण करणं इष्ट नाही असं त्यांचं सांगणं होतं.
राष्ट्र प्रथम मग समाज आणि नंतर स्वतः हे त्यांनी जगून दाखवलं होतं. देशाच्या
भल्यासाठी खोटं बोलणं हे गैर नाही असे ते सांगत. उगाच सत्याचं निरर्थक तुणतुणं
त्यांनी कधी लावलं नाही. एखादा दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण असेल तर त्याला खरं
कोणी सांगेल का? अर्थात सत्याचे प्रयोग करणारे महात्मे ह्यावेळी काय करत असतील हे
इतिहासालाच ठाऊक. लोकमान्य थेट, ठोस आणि ठाम भूमिका घेतात म्हणून त्यांना आणि
त्यांच्या समर्थकांना जहाल म्हणलं गेलं. आणि जहाल हा शब्दच ब्रिटिश धार्जिण्या
मवाळ लोकांनी बदनाम करून टाकला. आजही एखादी व्यक्ती थेट देशप्रेमाची गोष्ट सांगत
असेल तर त्याला बदनामच केलं जातं. देशाचे चुकलेले आदर्श हेच ह्याला कारणीभूत आहेत.
ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा आणि लोकमान्यांसारखे तेजस्वी
सुर्य जन्माला आले तो देश काजव्यांचं गुणगान करण्यात धन्यता मानत होता. स्वराज्य
हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच असं ठामपणे साहेबाला सांगायची छाती
अजून कोणामध्ये नव्हती. एकाबाजूनी क्रांतीकारकांना रसद पुरवत राहायची आणि दुसऱ्या
बाजूनी राजकीय चळवळ उभारायची असा दुहेरी हल्ला टिळक करत होते. देशाच्या सोनेरी
इतिहासाची युवकांना आठवण करून देत त्यांच्या भविष्याची पायाभरणी ते करत होते.
स्वतःवर देशद्रोहाचे खटले लागले आणि त्या खटल्यांमधून देशद्रोहाची व्याख्या ही
ब्रिटीशांना बदलावी लागली. त्यामुळे मवाळ लोक सरकारविरुद्ध काहीबाही का होईना बोलू
शकले.
सरकारवर हल्ला करण्यासाठी
लोकमान्यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केलं. पत्रकारिता कशी असावी ह्याचा देखील
एक आदर्श त्यांनी प्रस्थापित केला. आजकालच्या बुळचट पत्रकारांना हा झेपणारा आणि
मानवणारा नाही. “सरकारचे डोके ठिकाणांवर आहे काय?” हे ते कोणी सांगितलं म्हणून
लिहीत नव्हते तर जनतेच्या व्यथा राष्ट्रीय स्तरावर पोहोचतील ह्याची काळजी घेत
होते. केसरी हे राष्ट्रवादाचं मुखपत्र होते. त्यामध्ये ते त्यांच्या भूमिकेला कोणी
विरोध करत असेल तर ते देखील छापत होते. लोकमान्यांनी केसरी सुरू केला तो देखील
लोकांसाठी. लोकांना परवडेल अशी त्याची किंमत ठेवली. त्यांची अशी इच्छा होती की
अगदी एखाद्या खेड्यातल्या व्यक्तीला देखील सहज हे वर्तमानपत्र विकत घेता
यावं.
जे लिहिलं जात आहे त्याची पुर्ण
जबाबदारी टिळक घेत. त्यासाठी त्यांनी राजद्रोहासारखे गुन्हे देखील मागे लावून
घेतले. आजकाल कोणी थोडे डोळे वतारले तर अग्रलेख मागे घेणारे शेळपट पत्रकार स्वतःला
विचारवंत म्हणवून घेत असतात. लोकमान्यांनी ना अग्रलेख परत घेतले ना कधी वाङमयचौर्य
केलं. म्हणून ते आजही आदर्श पत्रकारितेचा वस्तूपाठ आहेत.
लोकमान्य हे स्वदेशीचे
पुरस्कर्ते होते. स्वदेशी वस्तू वापरा आणि त्यासाठी देशात उत्पादन करा ह्यासाठी ते
आग्रही होते. ह्याही बाबतीत देश त्यांचे विचार विसरला आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर
शंभर वर्षांनी हिंदुस्थानानी “आत्मनिर्भर” होण्याची गर्जना केली. विदेशी वस्तूंची
होळी त्यांनी केली. आणि आज काहीबाहीप्रमाणात आपला देश तोच कित्ता गिरवू पहात आहे
ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
लोकमान्य हे धर्माचरण करणारे
होते पण धर्मांध नव्हते. हिंदूंवर केलेला अन्याय त्यांना कदापि मान्य नव्हता पण ते
कधीही मुसलमानांवर अन्याय करा असं म्हणत नव्हते. सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या
त्यांच्या खुबीमुळेच त्यांना “लोकमान्य” ही पदवी प्रेमानी बहाल केली होती. सबका
साथ सबका विकास ही त्याचीच पुनरावृत्ती वाटते. लोकमान्यांनी गणेश उत्सव सुरू केला
तेव्हा त्यांनी देवाला रस्त्यावर आणला अशी टीका झाली. पण त्यातून लोकांचं व्यापक
संघटन होणार हे त्यांनी ठाऊक होतं. शिवजयंती आणि गणेशोत्सव ह्यामुळे ब्रिटिश
सरकारविरुद्ध निद्रिस्त भारतीय समाज एकवटायला सुरुवात झाली. देशसेवा हीच ईश्वरसेवा
हा त्यांचा सिद्धांत होता. चाफेकर, सावरकर असे अनेक ध्येयवेडे तरूण त्यांच्याकडे
आकृष्ट झाले. लोकमान्य हे धर्माभ्यासक होते. गीतेच्या विचारांची एक वेगळी
शास्त्रसुसंगत मांडणी करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये होतं. गीतारहस्य हा अद्भुत
ग्रंथ त्यांच्या दैवी लेखणीतून अवतरला. त्यावेळीदेखील त्यांच्यावर टीका झाली.
परंतु त्या टीकेला न जुमानता एक अजरामर ग्रंथ त्यांनी लोकांना उपलब्ध करून दिला.
त्याचं लिखाण पुर्ण झाल्यावर त्या ग्रंथांबाबत उत्सुकता लोकांमध्ये होती. ती
लक्षात घेता त्याची किंमत जास्त ठेवावी असा व्यावसायिक विचार टिळकांच्या आजूबाजूचे
लोक करत होते. अण्णासाहेब पटवर्धन लोकमान्यांना विचारते झाले “ किंमत काय ठेवणार?”
लोकमान्य म्हणाले “जास्तीत जास्त तीन रुपये ठेवावी असा विचार आहे”
पटवर्धन:- हे हो काय? जन्मभर
चिंतन करून आणि अनेक वर्षं मेहनत करून ग्रंथ लिहिलात आणि त्याची किंमत अवघी तीन
रुपये?
टिळक:- खरं म्हणजे अजूनही
कमी किमत ठेवता आली तर ती मला हवी आहे. हा धार्मिक ग्रंथ आहे तो जास्तीत जास्त
लोकांनी वाचावा अशी माझी इच्छा आहे. ग्रंथलेखनातून फायदा व्हाव हा हेतूच नाही.
लोकमान्य म्हणत असत की
लोकसेवकानं संपूर्णपणे लोकांवर अवलंबून रहावं. देशकार्यासाठी जो पैसा लागेल तो लोक
त्याला त्याची सेवाभावी वृत्ती बघून देतीलच.
गीतारहस्याप्रमाणेच Orion आणि Arctic Home in the Vedas अश्या ग्रंथांची
निर्मिती त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून झाली. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक
कंगोरे होते आणि तो प्रत्येक कंगोरा अभ्यासण्यासारखा आहे.
लोकमान्य कालही होते आजही
आहेत उद्याही राहतील. फक्त आपल्या जीवनात त्यांची मूल्य उतरवण्याची आवश्यकता आहे.
देशप्रेमाची आणि राष्ट्रसेवेची जी ज्योत लोकमान्यांनी लावली ती तशीच तेवत
ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. लोकमान्यांचे विचार आपण पुनरुज्जीवित करू शकलो तर
आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू शकू. देशाच्या कुचकामी
शिक्षणव्यवस्थेने आणि फुटकळ राजकारण्यांनी अडगळीत टाकलेल्या खऱ्या महात्म्याला
देशाच्या वैचारिक मांडणीत पुनःप्रस्थापित करण्याची जबाबदारी आपली आहे.
लेख खूपच सुंदर पद्धतीने लिहिला आहे. शेवटच्या परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे लोकमान्य टिळकांचे विचार आचरणात आणूनच भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू शकेल.
ReplyDeleteअवधूतजी लेख अतिशय छान झालाय, अभ्यासपूर्ण लेख झालाय अभिनंदन 💐💐🙏🏻🙏🏻
ReplyDeleteअर्थपूर्ण विचारप्रवर्तक लेखाकृती
ReplyDeleteआज च्या काळात खरया अर्थाने ह्याची गरज आहे.खुप डोळे उघडणारा लेख....अप्रतीम
ReplyDeleteलोकमान्यांचे असामान्यत्व स्पष्ट करणारा लेख आहे,प्रखर राष्ट्रवाद,ध्येयनिष्ठ, लेखणीतील सामर्थ्य, मातृभूमीशी एकनिष्ठता,सामर्थ्य शाली टिळकांची विचारधारा खुप प्रभावीपणे मांडली आजच्या काळात खरचं या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे.विचारप्रवर्तक लेखनाबद्दल धन्यवाद
ReplyDeleteटिळकांसारखे अद्वितीय आणि द्रष्टे व्यक्तिमत्व स्वतंत्र भारताला तितकेसे लाभले नाही हे निश्चित. त्यामुळेच आपल्या देशाची म्हणावी तेव्हढी प्रगती होऊ शकली नाही. स्वार्थाच्या आणि निर्बुद्धतेच्या अंधारात कोत्या मंडळींनी टिळकांच्या भूमिकेला जहालपणाचा रंग देत स्वत:ची पोळी भाजून घेतली. अहिंसेची अनाठायी धुंदी हेच आपले अध:पतनाचे मूळ होऊन राहिलंय. स्वतंत्र भारतात दांभिक समाजवादाचा बुरखा फाडला जाईल, तोच सोनेरी सुदिन.
ReplyDelete